Pune Gramin

देहूगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला धक्काबुक्की

By PCB Author

June 26, 2019

देहुगाव, दि. २६ (पीसीबी) – ‘सिध्देश्वर मंदिर रस्त्यावर राडारोडा का टाकला’ असे विचारत देहूगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला एकाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार सोमवारी (दि.२४) सकाळी पावणेआठच्या सुमारास देहू ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडला.

गणेश वसंत मुसुडगे (रा. देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ग्रामविकास अधिकारी अर्जून मरेप्पा गुडसुरकर (वय ५१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुडसुरकर हे देहूगावचे ग्रामविकास अधिकारी आहेत. सोमवारी सकाळी ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबले होते. तेथे आलेल्या आरोपी मुसुडगे याने गुडसुरकर यांना ‘सिध्देश्वर मंदिर रस्त्यावर राडारोडा का टाकला’ असे विचारत शिवीगाळ करत दमदाटी व धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी मुसुगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.