Pune Gramin

देहुरोड येथील गहुंजे मैदानावर बँक ऑफ महाराष्ट्राचा ताबा

By PCB Author

November 06, 2018

देहुरोड, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत येणाऱ्या पुण्याच्या गहुंजे मैदानाचा, बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मैदानाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँक ऑफ महाराष्ट्रकडून ६९.५० कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही कारवाई केल्याचे समजते आहे. मात्र या कारवाईचा क्रिकेटवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितलं आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँक या ४ शाखांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ६९.५० कोटींचे कर्ज मंजूर केले होते. या बँकाच्या मंडळाचे नेतृत्व बँक ऑफ महाराष्ट्र करत असून, योग्य वेळेत हप्ते न भरल्यास मैदानाचा ताबा घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.