देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सेविकांना मिळतोय “प्रोत्साहन भत्ता”

0
553

 – सामाजिक कार्यकर्ते किशोर गाथाडे यांच्या वतीने मदतीचा हात

निगडी दि.१० (पीसीबी) : कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या देहुरोड काँटोमेन्ट बोर्डाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील अकरा सेविकांना कोरोना संपुष्टात येईपर्यंत दरमहिन्याला पाचशे रुपये “प्रोत्साहन भत्ता” देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर गाथाडे व युवा मंचाच्या वतीने हा भत्ता त्यांना सुपुर्द करण्यास सुरवात केली आहे .

देहुरोड काँटोमेन्ट बोर्डाच्या वतीने निगडीतील सिद्धिविनायक नगरी, श्रीनगरी, श्री विहार, आशिर्वाद काॅलनी, समर्थ नगरी, दत्तनगर आणि परमार काॅम्प्लेक्स देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड वाॅर्ड क्रमांक ५ मधील भागात गेल्या दिड वर्षापासुन कोरोनाच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालुन तुटपुंज्या मानधनावर घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण करणाऱ्या या सेविकांना गेल्यावर्षी किशोरभाऊ गाथाडे युवा मंचाच्या वतीने “कोरोनायोद्धा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले होते.

तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या सेविकांना फक्त सन्मान देऊनच चालणार नाही तर सामाजिक बांधिलकीतुन त्यांना आर्थिक मदतीचा हातभारही लावला पाहिजे याच भावनेने गाथाडे यांनी या रुग्णालयाचे प्रमुख डॉ.वेळापुरे यांची भेट घेत या अकरा सेविकांना दरमहिना पाचशे रुपये प्रमाणे कोरोना संपुष्टात येईपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याची इच्छा व्यक्त केली त्यास डॉ. वेळापुरेंनी सहमत दर्शवली आणि दिनांक ०४/०६/२०२१ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करून हा भत्ता देण्यास सुरुवात केली आहे, आता दरमहिन्याला अधिकचे पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याने या सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, सर्व डॉक्टरांनी व सेविकांनी या स्तुत्य निर्णयाचे स्वागत केले.

या प्रसंगी सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भिमराव चौगुले, अजित नाईक, तेजस कुंभार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर, सर्व स्टाफ व सेविका उपस्थित होत्या.