देहुरोडमध्ये वकीलाची पोलीसाला धक्काबुक्की; वकीलाविरोधात गुन्हा दाखल

0
1231

देहुरोड, दि. १६ (पीसीबी) – देहुरोड पोलीस ठाण्यात एका वकीलाला सहायक पोलीस निरीक्षकाने गुन्ह्याच्या चौकशी संदर्भात पोलीस ठाण्यात हजर रहायला सांगितल्याने वकीलाने त्या सहायक पोलीस निरीक्षकाशी हुज्जत घालून मी न्यायाधीश आहे, असे बोलून धक्काबुक्की केली. ही घटना गुरुवारी (दि.१५) बीआरटी मार्ग किवळे येथे रात्री पावनेबाराच्या सुमारास घडली.

अर्जुन गुरुदास पवार असे धक्काबुक्की झालेल्या देहुरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचीन मारुती जोरे (वय ३८, रा. नांदेड सिटी, पुणे) या वकीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस ठाण्यात जबरदस्ती घरात घुसून मारहाण आणि चोरी या प्रकरणी कलम ३८०, ४५२ आणि ३२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन गुरुदास पवार यांनी वकील सचीन जोरे यांना चौकशीसाठी देहुरोड पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. यावेळी सचीन यांनी आरडाओरड करत अर्जुन यांच्याशी हुज्जत घातली. तसेच मी न्यायाधीश आहे, असे बोलून अर्जुन हे वरदीत असताना त्यांना धक्काबुक्की केल्याचे अर्जुन यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सचीन यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.