Pune Gramin

देहुरोडमध्ये पत्नीसोबत बोलतो म्हणून एकावर कोत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

By PCB Author

June 19, 2019

देहुरोड, दि. १९ (पीसीबी) – आपल्या पत्नीसोबत बोलत थांबल्याच्या रागातून दोघा जणांनी मिळून एकावर कोयत्याने प्राणघात वार केले. तसेच काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.१८) दुपारी तीनच्या सुमारास देहुरोड येथील विकासनगर किवळेमध्ये घडली.

हुसेन यामीन शेख (वय ३१, रा. पार्शी चाळ, देहुरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मेहबुब हनिफ शेख आणि इरफान शेख (दोघे रा. विकासनगर, किवळे) या दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास जखमी हुसेन हे आरोपी मेहबुब याच्या पत्नीसोबत बोलत उभा होता. यावेळी आरोपी मेहबुब आणि इरफान तेथे आले. पत्नीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन मेहबुब याने धारदार कोयत्याने हुसेनवर वार केले. तर इरफान याने काठीने जबर मारहाण करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर दोघेही आरोपी फरार झाले आहेत. देहुरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.