देहुरोडमध्ये अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0
538

देहुरोड, दि. १० (पीसीबी) – विकासनगर देहुरोड येथे राहणाऱ्या एका अभियंता तरुणीने राहत्या घरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

तृप्ती धिल्लोड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तृप्ती हिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे कुटूंबातील सर्वजण रुग्णालयात होते तर तृप्ती घरात एकटीच होती. कुटुंबियांनी तिला बराच वेळ मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क केला. त्यावेळी शेजारील लोक धिल्लोड यांच्या घरी गेले असता त्यांना तृप्ती मृतावस्थेत आढळली. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तृप्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. देहुरोड पोलिस अधिक तपास करत आहेत.