देहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक

0
589

देहुरोड, दि. ११ (पीसीबी) – दोघा मोबाईल चोरट्यांना अटक करुन गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने विविध कंपन्यांचे ६९ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास देहुरोड येथील शितळानगरच्या रोडलगत करण्यात आली.

योगेश रमेश देवकुळे (वय १९, रा. सुरेश मोरे यांची रुम, पाटिलनगर, चिखली) आणि अभिषेक उर्फ सापू करमसिंग भूंभक (वय २०, रा. दिपक आईस फॅक्टरीशेजारी, मेन बाजार देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत मोबाईल चोरट्यांची नावे आहेत. त्याच्याकडून देहुरोड पोलीस ठाणे हद्दीतील चार आणि चिखली पोलीस ठाणे हद्दीतील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा म्हणून पेट्रोलींग करत असताना, गुन्हे शाखेतील पोलीस नाईक फारुक मुल्ला यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, दोन इसम चोरीचे मोबाईल विक्रीसाठी देहुरोड शितळानगर येथे येणार आहेत. यावर गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीस पथकाने शितळानगर येथे सापळा रचून योगेश आणि अभिषेक या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सॅमसंग, ओपो, वन प्लस आणि रेडमी कंपनीचे ६९ हजार रुपयांचे एकूण सहा मोबाईल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन योगेश आणि अभिषेक या दोघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी उघड्या घरातु तसेच घरफोडी करुन मोबाईल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीसांनी त्यानुसार, देहुरोड आणि चिखली पोलीस ठाणे हद्दीत आरोपींनी केले एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहा पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम तसेच पोलीस कर्मचारी संपत निकम, धर्मराज आवटे, संजय गवारे, प्रविण दळे, फारुक मुल्ला, मयुर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदिप ठाकरे यांच्या पथकाने केली.