“देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल…” : शिवसेनेचा पाटलांना टोला

0
244

नाशिक, दि.२० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा काल केली. त्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातही सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींच्या कालच्या निर्णयाचं स्वागत करत, कृषी कायद्यावरुन त्यांना टोलेही लगावले आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केलीय. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. माझ्या शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत.

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात असल्याचं पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी कृषी कायद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून तो बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंना रनौत यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल. शेतकऱ्यांना मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या, गुंड पाठवले. मात्र, शेतकरी हटला नाही. हे स्वातंत्र्य आहे. हे लढवून मिळालं आहे, भीकेतून नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.