देशी पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसांसह चिखलीतून दोघांना अटक

1248

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – देशी बनावटीची एक पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसांसह चिखलीतील तळवडे रस्त्यावर असलेल्या भगवती ट्रेडर्स या दुकानासमोरुन दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.१२) दुपारी पावनेतीनच्या सुमारास चिखली पोलिसांनी केली.

मनोज सुरेश सिंग (वय ३४, रा. विलास ताम्हाण यांची बिल्डींग राजा शिव छत्रपती हौसींग सोसायटी ताम्हाणे वस्ती चिखली, मुळ रा. ७२ इटासरी ग्रामपोस्ट जमालपूर, थाना नयारामनगर जिल्हा मुंगेर, बिहार) आणि संतोष सुधिर रॉय (वय ३२, रा. शारदा गोविंद काळे यांची रुम, विठ्ठलवाडी आकुर्डी, मुळ रा. आकाहा खजरेखा ता. परवत्ता जि. खगारिया, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, आरोपी मनोज आणि संतोष या दोघांजवळ पिस्तूल असून ते चिखलीतील तळवडे रस्त्यावर असलेल्या भगवती ट्रेडर्स या दुकानासमोर येणार आहेत. पोलिसांनी त्यानुसार सोमवारी दुपारी पावनेतीनच्या सुमारास स्टाफसह त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी मनोज आणि संतोष या दोघांना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जीवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपी मनोज आणि संतोष याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बढे तपास करत आहेत.