“देशाला जागतिक स्तरावर कणखर बनविण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकास व विज्ञानाचे धडे देणे आवश्यक आहे” – ए.नारायणस्वामी

0
691

चिंचवड, दि.१५ (पीसीबी) : बाल दिनानिमित्त नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल चिंचवड येथे विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री श्री. ए.नारायणस्वामी उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते कला,क्रीडा,शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मा.मंत्री महोदय म्हणाले देशाला जागतिक स्तरावर कणखर बनविण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकास शिक्षणासोबत विज्ञानाचे धडे देणे आवश्यक आहे.शालेय वयात मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासाचे धडे देणे अत्यंत गरजेचे असून कोरोना काळात मुले अधिक काळ घरात राहिल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर ताण निर्माण झालेला आहे, शाळा चालू झाल्यानंतर हा ताण कमी करण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर जास्तीत जास्त क्रीडांगण उपलब्ध करून देणे व त्यातून त्यांची शारीरिक क्षमता वाढविणे महत्त्वाचे राहील.भारत सरकारच्या माध्यमातून विविध योजना व शिष्यवृत्तीचा लाभ जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हवी ती मदत करायला तयार आहे असेही ते म्हणाले.

संस्थेच्या उत्तुंग यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री.अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती मध्ये आमदार श्री महेश लांडगे, I.F.S अधिकारी श्री.सुनील वारे,मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एन. गायकवाड संस्थेच्या संचालिका नगरसेविका अनुराधा गोरखे व श्री. अमोल थोरात उपस्थित होते. याप्रसंगी कला,क्रीडा,शैक्षणिक क्षेत्रांतील प्राविण्य प्राप्त केलेल्या संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.