Desh

“देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेल्या”

By PCB Author

March 28, 2021

नवी दिल्ली, दि. 2८ (पीसीबी) : देशावर पुन्हा एकदा करोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. महाष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी ‘मन की बात’ केली. यावेळी मोदी यांनी लॉकडाउनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींनाही उजाळा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनच्या आठवणींना उजाळा दिला. मोदी म्हणाले, “गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल,” असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, “त्याचप्रमाणे करोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळं करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच करोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, करोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकर मोहीम राबत आहे,” असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. “योगायोग म्हणजे मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली. याचदरम्यान पी.व्ही. सिंधूनेही सिल्व्हर मेडल जिंकलं,” असं सांगत मोदी यांनी महिला खेळाडूंचं अभिनंदन केलं.