Desh

देशात २०४७ पर्यंत भाजपचे सरकार राहणार- राम माधव

By PCB Author

June 08, 2019

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – देशात काँग्रेस पक्ष हा सर्वात जास्त सत्तेत राहिलेला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसचा हा विक्रम मोडतील, असा मला विश्वास आहे. देशात २०४७ पर्यंत भाजपचे सरकार राहील, असे वक्तव्य भाजपचे महासचिव राम माधव यांनी केले आहे. त्रिपुरामधील अगरताळात आयोजित केलेल्या पक्षाच्या विजय रॅलीत ते बोलत होते.

काँग्रेसने १९५० ते १९७७ पर्यंत सत्ता भोगली आहे. आता भाजप हा रेकॉर्ड मोडणार आहे. देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० वर्षात पदार्पण करेल, त्यावेळी भाजपची सत्ता देशात असेल. म्हणजेच २०४७ पर्यंत भाजप सत्तेत राहील, असे राम माधव म्हणाले. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने लष्कराचा आधार घेतला नाही. आम्ही गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झालो. मजबूत भारत निर्माण करण्यात यशस्वी झालो, त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत इतका मोठा विजय मिळाला आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार खूप मोठा टप्पा पार करणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, भाजप २०४७ पर्यंत देशात सत्तेत राहील. सत्तेत येण्यासाठी आम्ही लष्कराचा वापर केला नाही. राष्ट्रभक्ती आमच्या रक्तात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.