देशात लोकसभेसाठी ७ टप्प्यात मतदान; मतमोजणी २३ मे रोजी

0
627

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभेच्या एकूण ५४३ जागांसाठी ७ टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार  आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. सर्व टप्प्यातील मतमोजणी २३ मे रोजी होईल.  २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली. 

देशात आजपासून आचारसंहिता लागू झाली, असेही त्यांनी सांगितले. मागील वेळी देशात ९ टप्प्यात मतदान झाले होते. विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे.

पहिल्या टप्प्यात २० राज्यांमधील ९१ जागांवर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ९७ जागांसाठी मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यातील ११५ जागांसाठी मतदान होईल. चौथ्या टप्प्यात ९ राज्यातील ७ जागा, ५ व्या टप्प्यात ७ राज्यातील ५१ जागा, सहाव्या टप्प्यात ७ राज्यातील ५९ जागा आणि ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यात ८ राज्यातील ५९ जागांसाठी मतदान होईल. दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजे १२ मे रोजी मतदान होईल.

लोकसभेसह निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकांचीही घोषणा केली. या दोन राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२ राज्यातील ३४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही लोकसभेबरोबर मतदान होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानकेंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला त्याने केलेले मत कोणाला गेले आहे, ते समजणार आहे.  त्याचबरोबर ईव्हीएमलाही अनेक स्तरीय सुरक्षा असेल. प्रत्येक उमेदवाराला फॉर्म २६ भरावा लागणार आहे. देशभरात एकूण १० लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. २०१४ मध्ये ही संख्या ९ लाखांच्या आसपास होती. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाणार आहे, असे ही आरोरा यांनी यावेळी सांगितले.