देशात पुन्हा नोटाबंदीनंतरचे चित्र; ५० टक्के एटीएम मशीन्स मार्च २०१९ पर्यंत बंद पडणार ?

0
1239

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – देशात पुन्हा नोटाबंदीनंतरचे चित्र दिसू शकते. कारण देशातील ५० टक्के एटीएम मशीन्स  मार्च २०१९ पर्यंत बंद पडण्याची शक्यता  एटीएम मशीन्स ऑपेर्सची संस्था असणाऱ्या कॉन्फरडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय)  व्यक्त केली आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये  बँक प्रशासनावर मोठा  ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

देशभरात सध्या अंदाजे २ लाख ३८ हजार एटीएम मशिन्स कार्यरत आहेत. त्यापैकी १ लाख १३ हजार एटीएम बंद पडण्याची शक्यता आहे. यातील १ लाख एटीएम हे बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नसणारे म्हणजे ऑफ साईट एटीएम्स तसेच १५  हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम आहेत. याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे एटीएममधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसणार आहे. तर शहरांमध्ये एटीएमबाहेरील रांगा लागल्याचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता  आहे, असे सीएटीएमआयच्या  प्रवक्त्यांनी  म्हटले आहे.

देशातील एटीएम ऑपरेटर्ससाठी नवीन नियमावली  लागू  केली  आहे. त्यांच्यावर हॉर्डवेअर तसेच सॉफ्टवेअर अपडेट्सबरोबरच सर्व एटीएममधील रोख रक्कम कॅस्टेल स्वॅप प्रकाराने भरण्याचे निर्बंध घातले आहेत.  त्या पध्दतीने काम सीएटीएमआयने सुरु केले आहे. या नवीन एटीएममुळे   एटीएम क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.