देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जातेय – सोनिया गांधी

0
166

जयपूर, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात हजेरी लावली असून पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन सुरु असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.

“पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादयीपणे स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणं तसंच लोकांना नेहमी भीती आणि असुऱक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणं आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे”.
नवसंकल्प चिंतन शिबीरच्या निमित्ताने भाजपा, आरएसएस आणि त्यांच्या सहाकऱ्यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं यावेळी सोनिया गांधींनी म्हटलं.
काँग्रेसचं चिंतन शिबीर १३, १४ आणि १५ मे असे तीन दिवस चालणार आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणं यामागचा मुख्य उद्धेश आहे. शुक्रवारी चिंतन शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसंच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी आहे असं सांगितलं.
यावेळी सोनिया गांधींनी संस्थेत बदल गरजेचे असून आपण आपल्या कामाची पद्धत बदलली पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं. “आपल्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा संस्थेला वरती ठेवलं पाहिजे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं असून आता परतफेड करण्याची वेळ आहे,” असं सोनिया गांधींनी सांगितलं होतं.