Desh

देशातील सर्व जनतेला कोरोना लस मोफत द्या – अरविंद केजरीवाल

By PCB Author

October 24, 2020

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : राजधानी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी “देशातील सर्व जनतेला कोरोना लस मोफत मिळाली पाहिजे. सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे. प्रत्येक नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहे, यामुळे मोफत कोरोना लस मिळणे गरजे आहे.” असं म्हटलं आहे. जेव्हा कोरोनावर लस उपलब्ध होईल तेव्हा त्याची किमंत किती असेल ते पाहिले जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मार्च पासून कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे शासकीय सुत्रांकडून सांगण्यात येते आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आज शास्त्रीनगर-सीलमपूर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले.

यानिमित्त केजरीवालांनी दिल्लीतील जनतेला शुभेच्छा दिल्या. शास्त्रीनगर आणि सीलमपूर उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे आईएसबीटी ते उत्तर प्रदेश सीमेवर जाण्याचा मार्ग सुकर होईल, असं केजरीवाल म्हणाले. यापूर्वी येथून जाताना जनतेला त्रास सहन करावा लागत होता मात्र, आता त्यातून सुटका होणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.  शास्त्री नगर आणि सीलमपूर येथील उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या पीडब्ल्यूडी विभागाचे केजरीवालांनी कौतुक केले. 303 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असणाऱ्या पुलाचे काम 250 कोटी रुपयांमध्ये पूर्ण करण्यात आले. दिल्लीचे 53 कोटी रुपये वाचवण्यात आल्याची माहिती केजरीवालांनी दिली.