देशातील वातावरण गढूळ होऊ नये; यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करू- शरद पवार

0
555

पुणे, दि. ७ (पीसीबी) – ‘अल्पसंख्याक समाजाबद्दल अनुद्गार काढताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले. देशात कोणी काय खावे, कोणते कपडे घालावेत, यासारख्या मुद्द्यांवरून वातावरण खराब करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेली विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्या संदर्भात शेट्टी यांचे नाव घेता पवार यांनी टीका केली. सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध धर्मीयांच्या स्वातंत्रलढ्यातील योगदानाबाबत शंका उपस्थित करीत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसची स्थापना झाली असून, त्यामध्ये अॅनी बेझंट यांचे महत्वाचे योगदान होते. अशा प्रकारची विधाने करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, अशी टीका पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित ईद मिलन कार्यक्रमास अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, अब्दुल गफार अब्दुल रज्जाक, चेतन तुपे, पी. ए. इनामदार आदी उपस्थित होते.

आज ख्रिस्ती, शीख, मुस्लिम धर्मियांविरुद्ध बोलले जाते. समाजातील सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार मांडणाऱ्या हिंदू धर्मीयांविरुद्धही बोलणाऱ्या शक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे. आजूबाजूच्या देशातील परिस्थितीही बिघडली आहे. पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह मुलगी, जावई यांना कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे. ही परिस्थिती देशाच्या आजूबाजूला दिसत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातील वातावरण आणखी गढूळ होऊ नये, यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करू,’ असेही पवार म्हणाले.