Desh

देशाचे सर्वात मोठे दुर्दैव;  आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार-राहूल गांधी

By PCB Author

September 24, 2018

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र चोरांचे सरदार आहेत अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. राफेल करारासंदर्भातला एक व्हिडिओच त्यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये रिलायन्सला या करारातून मोदींनी कसा फायदा करून दिला हे दाखवण्यात आले आहे. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी केलेला दावा पुढे आणत त्यांनीही आपल्या देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हटल्याचे म्हटले होते. त्याआधीही देश का चौकीदार चोर है म्हणत त्यांनी टीकेचे ताशेरे झाडले होते. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत म्हणत त्यांनी टीकेची तोफ डागली आहे. यावर आता भाजपा नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या वक्तव्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या चोर म्हटले आहे. भारताच्या इतिहासात ही बाब बहुदा पहिल्यांदाच घडते आहे. यानंतरही पंतप्रधान सूचक मौन का बाळगलं असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. राहुल गांधी यांना काहीही कळत नाही. ते पढवून दिल्यासारखे बोलतात. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका केलेली नाही. राहुल गांधी यांनी यावेळी मर्यादा सोडली असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं.

दरम्यान पाकिस्तानमधील अनेक मंत्री काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसाठी प्रचार करत असून मोदींना सत्तेतून हटवणे हेच राहुल गांधी व पाकिस्तानचे लक्ष्य असल्याची टीका भाजपाने केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. सध्या पाकिस्तान आणि काँग्रेसमध्ये काय समानता आहे?, असा प्रश्न उपस्थित करत पात्रा पुढे म्हणाले, पाकिस्तान व काँग्रेस हे दोघेही हताश झाले असून ते आता मोदींना सत्तेतून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पाकिस्तानमधील मंत्र्यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रिनशॉटही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत असे ट्विट केले आहे.