देशाची शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – पंतप्रधान मोदी

0
411

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरू केले होते. त्यामुळेच भारताला सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घ्यावा लागला,  असे सांगून जे लोक आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा आणि देशाच्या विकासात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार)  पाकिस्तानला दिला. 

मोदींनी ‘मन की बात’  कार्यक्रमाद्वारे देशवासीयांसोबत संवाद साधला.  पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २९ सप्टेंबर रोजी ‘पराक्रम दिवस’ साजरा करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याला सलामही केला. आता गप्प बसायचे नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न केला, तर आमचे सैनिक त्यांना जशास तसे उत्तर देतील. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग पत्करला आहे. मात्र त्यासाठी देशाच्या अखंडतेला धक्का पोहचू दिला जाणार नाही, असे मोदींनी ठणकावून सांगितले.

यावेळी त्यांनी नौदल अधिकारी अभिलाष टॉमीसंदर्भातही चर्चा केली, ‘अभिलाष यांचा जीव कसा वाचवला जाणार, याबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. ते खोल समुद्रात अडकले होते. न खाता-पिता मृत्युशी झुंज देत होते. अभिलाष हे धाडसी सैनिक आहेत. त्यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला तेव्हा त्यांनी पुन्हा असा पराक्रम करण्याचा संकल्प व्यक्त केला, असे मोदींनी सांगितले.