देशभरात २ ऑक्टोबरपासून प्लास्टीक बंदी

0
489

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टीक बंदीचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, २ ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टीक बंदी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असून सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टीक बॅग, प्लास्टीक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टीक पूर्णपणे बंद करण्यात येईल असे म्हटले होते.

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टीकची फुलेस बॅनर्स, प्लास्टीकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टीकच्या बाटल्या, प्लास्टीकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सध्या एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टीकमध्ये कोणत्या वस्तू येतात याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय लवकरच एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टीकची व्याख्या स्पष्ट करणार आहे. सध्या २४ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यांच्या काही सूचना असल्यास त्यादेखील देता येणार आहेत. सध्या प्लास्टीकच्या हँडलवाल्या आणि बिना हँडलवाल्या बॅग, प्लास्टीकची कटलरी, कप, चमचे, ताटे याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताटं, खोटी फुलं, बॅनर, झेंडे, प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीकच्टया स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, प्रत्येक कार्यालयांमध्ये कचरा वेगवेगळ्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. याव्यतिरिक्त टिव्ही, रेडिओद्वारे एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकचा वापर करू नये यासाठी राज्यांनी जनजागृती करावी, असेही सांगण्यात आले आहे. तसेच पर्यावरण स्थळे, धार्मिळ स्थळे, समुद्र किनारे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.