Maharashtra

देशभरातील टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील एकही पोलिस ठाणे नाही

By PCB Author

December 22, 2018

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – गेल्या वर्षभरात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील दहा पोलिस ठाण्याची नावे जाहीर करण्यात आली आहेत.  यात राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस ठाणे यादीमध्ये अव्वल  ठरले आहे. तर महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याला टॉप १० मध्ये स्थान मिळालेले नाही.

पहिला क्रमांक  राजस्थानमधील कालू बिकानेर, दुसरा क्रमांक अंदमान निकोबरमधील कॅम्पबेल बे, तर  तिसरा क्रमांक पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील फरक्का पोलिस  ठाण्याने पटकावला आहे.

गुजरातमध्ये सुरु असलेल्या डीजीपी-आयजीपी कॉन्फरन्सला २० डिसेंबरपासून सुरुवात झाली. यावेळी गृह मंत्रालयाकडून  २०१८ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देशभरातील  दहा पोलिस ठाण्यांचा गौरव करण्यात आला. गृहमंत्री राजनाथ सिंह याच्या हस्ते या तिन्ही पोलिस  ठाण्याच्या अधिकाऱ्यांना चषक देऊन सन्मानित केले.

उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या दहा पोलिस ठाण्याच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याचा समावेश नाही.  महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची तत्परताही ट्विटरवर पाहायला मिळते, मात्र प्रत्यक्षात त्यांची कामगिरी टॉप १० ला साजेशी झाली नसल्याचे समोर आले आहे.