Maharashtra

देशभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी कोण? – राज ठाकरे

By PCB Author

March 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – देशभक्ती आपल्याला शिकवण्याचा अधिकार पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना कोणी दिला? राष्ट्रभक्ती शिकवणारा भाजप कोण? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला.

मोदी स्वत:ला राष्ट्रभक्त मानत असतील, तर विमान फिरवून नवाझ शरीफ यांच्या भेटीला कशाला गेले होते, त्यांना केक भरवायला कशाला गेलात, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाच्या कंपनीत २ भागीदार आहेत. त्यातील एक अरब आहे तर दुसरा पाकिस्तानी आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. हे सर्व भाजपला चालते. या ठिकाणी इतर कोणी असता, तर त्यांना देशद्रोही ठरवले गेले असते, असे राज ठाकरे म्हणाले.