देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; राज्यपालांकडे केला सुपूर्द

0
675

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यां नी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. मावळत्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात येईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस शनिवारी राजीनामा देतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी एक दिवस आधीच राजीनामा सादर केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटूनही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. ‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते.

राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आल्याने गुरुवारच्या राजकीय हालचालींकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शिवसेना आमदारांची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा करताना सत्तेचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पद प्रत्येकी अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय झाला होता. या चर्चेनुसारच सत्तेचे वाटप व्हावे, या भूमिकेवर ठाकरे ठाम आहेत. आपल्याला भाजपसोबतची युती तोडायची नाही, फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेचे वाटप व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले.