Desh

देवदासी, सती प्रथेप्रमाणे ‘खतना’  प्रथाही बंद व्हावी; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात मागणी

By PCB Author

August 01, 2018

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथांपैकी देवदासी, सती या प्रथा कायद्याने बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मातील खतना ही अनिष्ट प्रथाही बंद करण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरु आहे.

केंद्र सरकारच्या प्रतिनिधी वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, मुस्लिम दाऊदी बोहरा समुदायातील मुलींसोबत होत असलेले फिमेल जेनिटल म्युटिलेशन अर्थात खतना प्रथा चुकीची आहे. यामुळे मुलींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्याची कोणत्याही परिस्थितीत भरपाई होऊ शकत नाही. त्यामुळे घटनेच्या चौकटीत न बसणारी ही प्रथा सती आणि देवदासी प्रथांप्रमाणे बंद करण्यात यावी.

तर दुसरीकडे दाऊदी बोहरा समाजाने खतना प्रथेचे समर्थन केले असून या समाजाच्यावतीने जेष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली. ते म्हणाले, खतना पद्धत मुलींच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा प्रचार करणे चुकीचे आहे. कारण मुली वयात आल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांद्वारेच ही शस्त्रक्रिया केली जाते.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर खंडपीठाकडून याबाबतची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होईल, असे सांगण्यात आले.