दुसऱ्या कसोटीत भारताची दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात

0
433

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुण्याच्या गहुंजे मैदानावर  झालेल्या  दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २ -०  अशी आघाडी घेतली आहे.  फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची   दैना उडवली. घरच्या मैदानावरचा भारतीय संघाचा हा सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला आहे.  आतापर्यंत कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस आफ्रिकेचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी २७५ धावांवर संपवला. विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रिकेची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर एडन मार्क्रम इशांत शर्माच्या गोलंदाजीवर भोपळा ही न फोडता माघारी परतला. यानंतर डी-ब्रूनही उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने त्याचा सुरेख झेल टिपला.

यानंतर डीन एल्गर आणि कर्णधार पाफ डु-प्लेसिस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर डु-प्लेसिस बाद झाला. यानंतर डीन एल्गरही बाद झाल्यामुळे आफ्रिकेचा संघ अधिकच अडचणीत सापडला. उपहाराच्या सत्रानंतर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकही रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर बावुमा आणि मुथुस्वामी यांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला.