दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १४६ धावांनी विजय; भारताचा धुव्वा  

0
571

पर्थ, दि. १८ (पीसीबी) – दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी भारताचा दारूण पराभव केला. या विजयामुळे  मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ बळी घेण्याची आवश्यकता होती.  सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या  ५ फलंदाजांना तंबूत पाठवून सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. या  सामन्यात ८  बळी  घेणाऱ्या लॉयनला सामनावीरचा किताब देण्यात आला.

चौथ्या दिवसअखेर भारताला ५ बाद ११२ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र दुसऱ्या डावात भारताची सुरूवात खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला, तर भरवशाचा फलंदाज पुजारा ४ धावा करून बाद झाला. कोहली (१७), विजय (२०) आणि रहाणे (३०) यांनी काही काळ  डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर आज दिवसाच्या खेळात आधी विहारी (२८), पाठोपाठ पंत (३०), उमेश यादव (२), इशांत शर्मा (०) आणि बुमराह (०) तासाभराच्या कालावधीत बाद झाले.