दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे आठ हजार कोटींची मागणी

0
472

नवी दिल्ली, दि.८ (पीसीबी) – राज्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर असून आठ हजार कोटींची मदत महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे केली आहे. ७ हजार ९६३ कोटी ६३ लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्राकडे सादर केला. दुष्काळासह राज्यातील विविध विषयांवर फडणवीस यांनी पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. राज्याच्या मागणीबाबत त्वरित पावले उचलली जातील, असे मिश्रा यांनी सांगितले.

ग्रामीण जनतेला निवारा देण्यासाठी पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत घरांची बांधणी केली जात आहे. सर्वासाठी घरे देण्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राज्याला आणखी घरांच्या मंजुरीची गरज आहे. ६ लाख अतिरिक्त घरबांधणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थीना ५०० चौ. फुटांच्या जागाखरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.