Maharashtra

दुष्काळावर अशी करा मात; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

By PCB Author

November 18, 2018

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राज्य सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच  दुष्काळाबाबत निश्चित कृती कार्यक्रम हाती घेण्यात यावा, या मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले आहे.  वेळीच योग्य ती पावले उचलून दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यात यावा, असे या पत्रात पवारांनी  म्हटले आहे.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत टिप्पणीही पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

राज्यात यंदा पाऊसमान कमी झाला आहे. हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यंदा राज्यात दुष्काळाचे संकट इतके गडद झाले आहे की,  पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे पशुधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर ठोस कृती कार्यक्रम हाती घेण्याची   मागणी शरद पवार यांनी केली आहे.