दुष्काळात सेलिब्रेशन, कॉंग्रेस आमदाराची पावले गाण्यावर थिरकली

0
514

वर्धा, दि, २१ (पीसीबी) – राज्यात एकीकडे दुष्काळग्रस्त स्थिती असल्याने विरोधक राज्य सरकार विरोधात आक्रमक होत असतानाच त्यांच्यातील एक आमदार खासगी कार्यक्रमात डान्स करण्यात गुंग असल्याचे दिसत आहे. वर्धा जि्ह्यातील आर्वी येथील काँग्रेस आमदार अमर काळे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, यावेळी राज्यात दुष्काळासारखी भीषण परिस्थिती असल्याचे विसरुन ते लग्नाच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. जनतेसमोर राज्य सरकारवर टीका आणि खासगीत अशा प्रकारे डान्स केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

वर्धा जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट असताना आमदाराला असा डान्स करताना काहीच वाटत नसेल का? असा प्रश्न सध्या वर्धा जिल्ह्याचे रहिवासी विचारत आहेत. दुष्काळ आणि त्यात असे सिलीब्रेशन हे कितपत योग्य आहे असा सूर सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतो आहे.

दरम्यान, अमर काळे यांनी प्रतिक्रिया देताना बहिणींनी आग्रह केल्याने नाच करावा लागला असे स्पष्टीकरण दिल आहे. ‘माझ्या चुलत भावाला आई,वडील नाहीत. मीच प्रमुख असल्याने सर्व कार्यक्रमात सहभागी झालो होतो. बहिणींनी आग्रह केल्याने मला नाच करावा लागला. या घटनेशी कृपया दुष्काळाशी संबंध जोडू नये. माझे सार्वजनिक वर्तन चांगले राहिले आहे याची आठवण ठेवावी’, असे त्यांनी म्हटले आहे.