दुष्काळाकडे लक्ष देण्यासाठी कुंभकर्णाला जागं करणार – उध्दव ठाकरे   

0
398

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राज्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळ झपाट्याने हातपाय पसरत आहे. त्यामुळे कोणत्या विभागात काय कामे करायला पाहिजे, यासाठी आम्ही आढावा घेतला आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका  घेतली आहे.  त्यामुळे झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी २४ तारखेला पंढरपूरला सभा घेणार आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले.

ज्या भागात दुष्काळ तीव्र आहे, त्या विभागात  काय कामे करायला पाहिजे, यासाठी आढावा घेतला. शिवसेना नेहमीच दुष्काळाच्या मुद्द्यांवर आक्रमक असते. त्यामुळे ‘कुंभकर्णा जागा हो’ अशी आमची पुढची भूमिका असणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेने दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळी दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांना  राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत, की नाही, याबाबत खातरजमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.