दुर्बिणीद्वारे जठरातील उघडी सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश

0
596

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे नुकतेच ५५ वर्षीय पुरुष रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात दाखल झाले होते. दाखल होण्याच्या तीन दिवसापूर्वी जेवण करताना नकळत रुग्णाने सेफ्टी पिन गिळली. ही सेफ्टी पिन जठरामध्ये अडकून बसली असे एक्सरे मध्ये सिद्ध झाले. तातडीने रुग्णाचे सी टी स्कॅन करण्यात आले त्यावेळी असे निदान झाले की ती सेफ्टी पिन उघडी असल्याचे दिसून आले. ही उघडी सेफ्टी पिन जठराला इजा करू शकते म्हणून तातडीने एन्डोस्कोपी करण्यात आली. कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता उघडी सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. सदर रुग्ण सुखरूप असून त्यांना दोन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे.

सदर रुग्ण डॉ. विरेंद्र आठवले ( शल्य चिकित्सक ) यांच्या देखरेखी खाली उपचार घेत होते. डॉ. अमोल डहाळे ( मेडिकल गेस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट) यांनी दुर्बिणीद्वारे करण्यात आलेली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली या संपूर्ण प्रक्रियेत शल्य चिकित्सा विभागाने प्रमुख प्राध्यापक डॉ. शहाजी चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अश्या गुंतागुंतीच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात करण्यात येत असून आमच्याकडे अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी या प्रक्रियेत सहभागी डॉक्टरांचे कौतुक केले.