दुर्देवी: निगडी येथे विष पिऊन आत्महत्या केलेल्या त्या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा

0
660

निगडी, दि. १२ (पीसीबी) – मुलगा अनेकांची आर्थीक फसवणूक करुन पसार झाला. त्यानंतर देणेकऱ्यांनी त्याची आई आणि मावशी या दोघींकडे पैशांसाठी तगादा लावला. या त्रासाला कंटाळुन या दोघा बहिणींनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आईचा रविवारी (दि.१०) मृत्यू झाला. मात्र दुर्देवी बाब म्हणजे या मृत आईवरच एकाने सोमवार (दि.११) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर (वय ३४, रा. त्रिवेणीनगर तळवडे) आणि मंगला गोकुळ नार्वेकर (वय ५५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील मंगला यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रवीण पर्वतराव बराटे (वय ५०, रा. मु.पो. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रशेखर आणि त्याची आई मंगला यांनी फिर्यादी यांची मुलगी शैलेजा हिला महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात सहाय्यक पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना प्रशासन अधिकारी, आस्थापना, पिंपरी चिंचवड मनपा, यांची खोटी सही आणि दस्तावेज तयार करून बनावट नियुक्ती पत्र देऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. मंगला नार्वेकर यांनी देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ६ मार्च रोजी आपल्या अपंग बहिणीसह विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान रविवारी (दि.१०) मंगला यांचा मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे सोमवारी प्रवीण बराटे यांनी चंद्रशेखर नार्वेकर आणि त्याची मृत आई मंगला नार्वेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.