दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणून दलित युवकाला मारहाण

0
1674

गांधीनगर, दि. २७ (पीसीबी) – गुजरातमध्ये पुन्हा एकदा जातीय द्वेषाचे प्रकरण समोर आले आहे. मेहसाणा जिल्ह्यात स्वतःच्या दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणून येथे एका दलित युवकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. वीरसंघ झाला(१९), रानूभा झाला(२०), रामजी झाला(३७), विक्रमसिंह झाला(१९) , दनभा झाला(२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहसणा जिल्ह्यातील अकबा गावात हा प्रकार घडला . येथे जयदेव परमार नावाच्या तरुणाने आपल्या दुचाकीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता. परमारने केलेल्या तक्रारीनुसार, गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावल्यापासूनच गावातील एक गट त्याला त्रास देत होता. कुटुंबातील ७० वर्षांच्या ज्येष्ठ महिला चंचल परमार यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबतही मारहाण करण्यात आली.

दोघांनाही सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय दलित मंचाचे कार्यकर्ता रमेश परमार यांनी मेहसाणा जिल्ह्यामध्ये दलितांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे म्हटले आहे. विठ्ठलपूर येथेही काही दिवसांपूर्वी दलित तरुणाला मारहाण करण्यात आली होती. रणतेज गावातील एका धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी दलितांना वेगळ्या रांगेत उभे करण्यात आले होते, असे परमार म्हणाले. बहुचरा जी तालुक्यात दलित तरुणांना घोड्यावरुन वरात काढण्याची परवानगी नाही, तेथे दलितांना मंदिरातही जाऊ दिले जात नाही किंवा सार्वजनिक स्मशनभूमीचा वापरही त्यांना करु दिला जात नाही, असा आरोप रमेश परमार यांनी केला आहे.