दुकानात प्लास्टिकची पिशवी आढळून आल्यास कायमचे टाळे लागणार

0
670

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत.  दुकानात एखादी जरी प्लास्टिकची पिशवी आढळून आल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुकानाला टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज (मंगळवार) दिली. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे आदेश  पर्यावरण खात्याला दिले.प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलली जातील, असे सांगून प्लास्टिक वापरणार नसल्याचे दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतले जाणार आहे. प्रत्येकाला संधी देऊनच ही कारवाई करण्यात येणार आहे,  असे कदम  यांनी यावेळी सांगितले.

राज्यात काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तसेच जुना स्टॉक संपविण्यासाठी दुकानदारांना तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, दुकानदारांनी मुदत संपूनही प्लास्टिक पिशव्यांच्या वापर सुरुच ठेवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे  पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला  आहे, असे कदम यांनी सांगितले.