Maharashtra

‘दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोषी वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना वाचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न’; भाजप नेत्याचा आरोप

By PCB Author

April 10, 2021

अमरावती, दि. १० (पीसीबी) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी तत्कालीन अपर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. एस. के. मुनगीलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अमरावती पोलिसांकडे अजूनही निकालाची प्रत पोहचलेली नाही का? की रेड्डीला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानावर होत्या. मात्र, रेड्डी यांनी विनोद शिवकुमार यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही व त्याच्या वर्तणुकीला आळा देखील घातला नाही. दीपाली आत्महत्या प्रकरणात रेड्डी सरकारी दस्ताऐवज फेरफार करू शकतात किंवा पुरावे प्रभावित करू शकतात.

तपासात खोडा घालण्यास देखील रेड्डी कारणीभूत ठरू शकतात. विनोद शिवकुमारच्या तक्रारींकडे रेड्डी यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा ठपका न्यायाधीश एस. के. मुनगीलवार यांनी ठेवला आहे. न्यायालयीन सुनावणीत ताशेरे ओढले असतानाही पोलिसांचा व सरकारी उच्चपदस्थांचा रेड्डीला वाचवण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न देखील कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे.