Maharashtra

दीड शहाण्यांनी आधी समजून घ्यावे; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

By PCB Author

October 25, 2018

मुंबई, ददि. २५ (पीसीबी) – शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा सवाल विचारणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य विरोधकांना शिवसेनेने गुरुवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले. शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने उठवलेला आवाज नीट समजून घेतला पाहिजे, अशा शब्दात शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने दुष्काळाच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि अन्य पक्षांवर टीका केली आहे. गेल्या ४० दिवसांपासून निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या वणव्यात होरपळतो आहे. खरिपाची सगळी पिके गेली आणि रब्बीचीही पिके आता दुष्काळामुळे घेता येणार नाहीत. शेतजमिनींचे हे वाळवंट उघड्या डोळ्यांनी धडधडीत दिसत असताना ‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?, असा सवास शिवसेनेने भाजपाला विचारला. राज ठाकरे आणि अन्य विरोधी पक्षांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर अग्रलेखात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

दुष्काळाच्या भयंकर संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याविषयी शिवसेनेनेच सरकारला बजावले होते. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ग्रामीण भागापासून ते मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत शिवसेनेने सरकारवर चौफेर दबाव आणला. शिवसेनेच्या दबावानंतर सरकारने १८० तालुक्यांतील वीस हजार गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे मान्य केले. पण ही काही श्रेय घेण्याची लढाई नव्हे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून शिवसेनेने उठवलेला हा आवाज नीट समजून घेतला पाहिजे. शिवसेना सरकारमध्ये जरूर आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या विषयांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेशिवाय दुसरे कोण पुढे असते?, असा प्रश्न अग्रलेखाच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. यात राज ठाकरे किंवा अन्य नेत्यांचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. पण अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेने त्यांनाच प्रत्युत्तर दिल्याचे दिसते.