दिवाळीत एसटीची १० टक्के भाडेवाढ; सर्वसामान्यांचा प्रवास महाग   

0
486

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ऐन दिवाळी सणाच्या काळात  राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.१ ते २० नोव्हेंबर या २० दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीवेळी दरवाढ केली जाते. त्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांचा  प्रवास महागणार आहे.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. या वर्षी सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्केपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते.

दिवाळी किंवा इतर सणावाराच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या ग्राहकांकडून अव्वाच्यासव्वा भाडेवाढ करतात. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवण्यात येतो आहे. परंतु, आता एसटीनेही महसूल वाढीसाठी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.