दिल्ली विधानसभेच्या आज ७० जागांसाठी मतदान एकूण ६७२ उमेदवार रिंगणात

0
418

दिल्ली, दि.८ (पीसीबी) – दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण ७० जागा असून, ६७२ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना आहे. प्रचारामध्ये आप आणि भाजपा आघाडीवर होते. दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार असून, ते आज आपला मतदानाचा हक्क बजावतील.

शाहीनबागच्या मुद्द्यावरून दिल्लीत मतांचे ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या भाजपच्या त्रिकूटाची आज, शनिवारी होत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीपुढे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक आयोगाने मतदान सुरक्षीत पार पडावे, यासाठी सीआरपीएफच्या १९० तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे १९ हजार जवान तैनात केले आहेत. सुधारणा नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असलेल्या शाहीन बागेत देखील ५ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.