दिल्ली जिंकत मुंबईने विजय हजारे करंडक पटकावला

782

मुंबई, दि. २० (पीसीबी) – बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर मुंबईने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्लीवर मात करत विजेतेपद पटकावले. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ४ गडी राखून सामना जिंकला. दिल्लीने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे आव्हान मुंबईच्या आदित्य तरे आणि सिद्धेश लाड यांनी शतकी भागीदारी करत पूर्ण केले.आदित्य तरेने सामन्यात ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. सिद्धेश लाडने ४८ धावांची खेळी केली. २००७ साली मुंबईने या स्पर्धेचे शेवटचे विजेतेपद मिळवले होते. यानंतर तब्बल १२ वर्षांनी मुंबईने या स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरले आहे.  

मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईचे  गोलंदाज तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी यांनी टिच्चून मारा करत दिल्लीच्या ३ फलंदाजांना झटपट तंबुत  धाडले. यानंतर नितीश राणाने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवम दुबेने सिद्धेल लाडकरवी झेलबाद करत दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज माघारी परतत राहिले.

दिल्लीच्या हिम्मत सिंहने तळातील फलंदाजांच्यासोबतीने संघाला १५० धावसंख्यांचा पल्ला गाठून दिला. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शिवम दुबे यांनी प्रत्येकी ३-३ फलंदाजांना बाद केले. तर दुषार देशपांडेने २ आणि शम्स मुलानीने १  बळी टिपला.