Maharashtra

दिलासादायक बातमी; मुंबईमध्ये आजपासून ‘या’ गोष्टी सुरु ; महानगरपालिकेचा निर्णय

By PCB Author

August 16, 2021

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना आणखी एक दिलासा दिला आहे. महापालिकेने सोमवारपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली केली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र यासाठी पालिकेतर्फे लागू करण्यात आलेल्या नियम आणि अटींचं बंधन घालण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजनांचे नागरिकांना अनिवार्यपणे पालन करावे लागणार आहे.

मुंबईत काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्युदरात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील करोना स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईतील करोना निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंबंधी आज आदेश जारी केले आहेत.

करोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याच्या अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता आणली जात असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहतील पण यांसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत, जे नियम पाळणं नागरिकांना अनिवार्य असेल.