दिघी पोलिसांची ५० हजारांच्या खंडणीसाठी आळंदीतील हॉटेल चालकाला जबर मारहाण

0
5162

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – दिघी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांनी  ५० हजारांची मागणी करत आळंदीतील वैभव पॅलेस या हॉटेलमधील चालक आणि कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि.७) रात्री ११ वाजण्याचा सुमारास घडला. याप्रकरणी तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी हॉटेल मालकाला देण्यात आली. पोलिसांच्या या कृतीवर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी हॉटेल मालक अवधूत जालिंदर गाढवे, ( वय २७ रा. स्पाईन रोड, सेक्टर ६) यांची दिघी पोलीस ठाण्यात तात्पुरती तक्रार दाखल करून घेतली आहे. तर लिंगराज रंगे गौडा (वय ४९ रा. हडपसर,पुणे) विशाल शंकर गिरी (वय २२ रा. आळंदी) यांना जबर मारहाण करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि इतर तिघेजण आळंदी- पुणे रस्त्यावरील हॉटेल वैभव पॅलेसमध्ये गेले. आणि थेट काऊंटरवरील लिंगराज गौडा यांना मारहाण करत ५० हजारांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिला असता गौडा यांना आतील खोलीत नेऊन जबर मारहाण केली. यात त्यांच्या पोटावर आणि तोंडावर मोठी दुखापत झाली. तर या मारहाणीत त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्याचबरोबर हॉटेलमधील कर्मचारी विशाल गिरी याला देखील लोखंडी पट्टीने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पाठीवर मोठे व्रण उठले आहेत.

या मारहाणीनंतर लिंगराज गौडा यांच्या खिशातील पोलिस कॉन्स्टेबल यांनी १९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान या प्रकाराची तक्रार दिघी पोलीस ठाण्यात देण्यास हॉटेलचे मालक अवधूत गाढवे गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. तसेच तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी देण्यात आली.