दिघीत हॉटेल व्यवसायिकाच्या डोक्यात दगड मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

0
558

दिघी, दि.१३ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाने हॉटेल व्यवसायिकाच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि पसार झाला. ही घटना सोमवारी (दि. ११) सकाळी अकराच्या सुमारास आळंदी रोड वडमुखवाडी येथील चंद्रफुल गार्डन हॉटेल जवळ घडली.

राजेंद्र चंद्रभान गुप्ता (वय ५६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे दगडाचा मार लागून गंभीर जखमी झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल दत्तात्रय तापकीर (वय २८, रा. शिवनगरी, आळंदी रोड, वडमुखवाडी) या तरुणाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राजेंद्र यांचे आळंदी रोड वडमुखवाडी येथे चंद्रफुल नावाचे हॉटेल आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना हॉटेलच्या कंपाउंडजवळ धूर येत असल्याचे आढळुन आले. याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वॉचमनला जाऊन बघण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी निखिल याने त्याच्या जागेत कचरा पेटवला होता. या आगीमुळे हॉटेलच्या कंपाउंडजवळ असलेल्या झाडांना इजा पोहोचू नये यासाठी राजेंद्र यांनी वॉचमनला तिथेच थांबण्यास सांगितले. त्यावरून निखिल याने हॉटेल परिसरातील झाडे पेटवून देण्याची धमकी देत राजेंद्र यांना शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.  निखिल कुऱ्हाड घेऊन राजेंद्र यांच्या अंगावर धावून आला. त्याला घाबरून राजेंद्र पळु लागले आणि पायातपाय अडकुन जमिनीवर पडले. निखिल याने राजेंद्र यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजेंद्र गंभीर जखमी झाले. याप्रकरणी निखिल विरोधात दिघी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक राऊळ तपास करत आहेत.