दिघीत दोन हजारांचा हप्ता दिला नाही म्हणून टोळक्यांकडून दुकानदाराला जबर मारहाण

0
628

दिघी, दि. २५ (पीसीबी) – दोन हजारांचा हप्ता न दिल्याच्या कारणावरुन तीन जणांच्या टोळक्यांनी एका दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.२४) रात्री साडेनऊच्या सुमारास दिघी रस्त्यावरील सागर प्रोव्हिजन स्टोअर येथे घडली.

लक्ष्मण वाघोजी दळवी (वय ७५, रा. भोसरी) असे जखमी दुकानदाराचे नाव असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुन्ना उर्फ राजेश रविशंकर तिवारी (वय २२, मोरेवस्ती, चिखली), अमित चंद्रकांत सोनवणे (वय २४, दिघी रोड, भोसरी) आणि विजय मनबहादूर थापा (वय २३, रा. लांडेवाडी, भोसरी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पेश मुरकर आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दळवी यांचे दिघी रस्त्यावर सागर प्रोव्हिजन स्टोअर नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री ते दुकानात असताना आरोपी मुन्ना आणि त्याचे काही साथीदार दुकानात घुसले. त्यांनी दळवी यांना दमदाटी करुन दोन हजारांचा हप्ता देण्याची धमकी दिली. मात्र दिळवी यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावर चिडलेल्या आरोपींनी दळवींना दुकानातून बाहेर काढले आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. यावेळी हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करण्यास आलेल्या सचिन फुगे यांनाही आरोपींनी मारहाण केली. तसेच परिसरात मोठमोठ्याने शिवीगाळ करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.  घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने घटनास्थली धाव घेऊन तिघा आरोपींना अटक केली. तर तपासादरम्यान आरोपी मुन्ना हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.