दिघीत जावयाला मदत करणे पडले महागात; जमीन व्यवहारात सासऱ्याला साडेतीन कोटींचा गंडा

0
1159

दिघी, दि. ७ (पीसीबी) – जावयाला कर्ज झाले म्हणून मदत करण्यासाठी निघालेल्या सासऱ्याची जमीन व्यवहारात तब्बल ३ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३१ ऑगस्ट २०१६ ते  ६ ऑगस्ट २०१८ दरम्यान पराठेमळा, चऱ्होली येथे घडला.

याप्रकरणी अनिता सदाशिव पठारे (वय ४७, रा. पठारेमळा, च-होली बुद्रुक, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश तुकाराम खांदवे (वय ४३, रा. लोहगाव, पुणे) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता पठारे यांचे जावई नवनाथ नंदकुमार आव्हाळे (वय 34, रा. आव्हाळवाडी, पुणे) यांनी सुरेश खांदवे यांच्याकडून २७ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. नवनाथ सुरेश यांना ते कर्ज परत करू शकले नाहीत. त्यामुळे नवनाथ यांनी सुरेश यांना त्यांचे सासरे सदाशिव पठारे यांची चऱ्होली येथील जमीन विकत घेण्याबाबत सांगितली. तसेच सासरे सदाशिव यांना मदत म्हणून पैसे मागितले. सदाशिव यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी त्यांच्या मालकीची  जमीन विक्रीस काढली.

नवनाथ यांनी त्याचा मित्र संदीप उर्फ पंकज राजाराम आव्हाळे (वय ३८, रा. आव्हाळवाडी, वाघोली) यांच्यामार्फत सुरेश यांना जमीन घ्यायचे असल्याचे सांगितले. चर्चेनंतर ही जमीन २ कोटी २१ लाख ७६ हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरले. सुरेश यांनी सदाशिव यांना वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून ८० लाख रुपये दिले. तर उर्वरित १ कोटी ४१ लाख रुपये रकमेचा चेक सही न करता दिला. वारंवार पाठपुरावा करून सुरेश यांनी उर्वरित रक्कम दिली नाही. यामुळे सदाशिव यांनी  विकलेली जमीन परत आपल्या नावावर करून देण्याची मागणी केली. त्यासाठी सुरेश यांनी दिलेल्या रक्कम आणि आणखी काही रक्कम देऊन व्यवहार करण्याचे ठरले. तडजोडी नंतर १ कोटी ८० लाख रुपयांना जमीन पुन्हा घेण्याचे ठरले. जमीन असताना सदाशिव यांनी ठरलेल्या रकमेपैकी २० लाख रुपयांचा बँकेचा डीडी सुरेश यांना दिला. मात्र, खरेदीखतावेळी सुरेश यांनी डीडी खात्यावर जमा झाल्याशिवाय सही करणार नसल्याची भूमिका घेतली. दुसऱ्या दिवशी डीडी ची रक्कम सुरेश यांच्या खात्यावर जमा झाली. तरीही सुरेश यांनी खरेदीखत केले नाही.

यावर सुरेश यांनी एकूण ३ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अनिता पठारे यांनी दिघी पोलिसात केली आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.