Pune

दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

By PCB Author

September 06, 2018

पुणे, दि. ६ (पीसीबी) – गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळेचा सीबीआयला अखेर ताबा मिळाला असून पुणे न्यायालयाने आज (गुरुवार) अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना अमोल काळेने मदत केल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला.

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती उजेडात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित मारेकरी कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली होती. अमोल काळेचा ताबा मिळावा, यासाठी सीबीआयने प्रयत्न सुरु केले होते. अखेर अमोल काळेला सीबीआयने ताब्यात घेतले आणि त्याला आज (गुरुवार) दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपी अमोल काळेला न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.