दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी का सापडत नाहीत? – उच्च न्यायालय

0
395

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय आणि राज्य सरकारला आज (गुरूवारी) खडे बोल सुनावले. सीबीआय आणि एसआयटीने दाखल केलेल्या सीलबंद अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने दाभोळकर प्रकरणात सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव यांना पुढील सुनावणीवेळी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले.  

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे १२ जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. दाभोळकर-पानसरे कुटुंबियांनी तपासात होत असलेल्या दिरंगाईविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयाने धारेवर धरत तपासात प्रगतीच होणार नसेल, तर आमच्यासमोर दुसरा पर्याय काय? असा सवाल केला.

कर्नाटकातील विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येऊन अटक करतात. आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच माहिती मिळत नाही? याचे आम्हाला आश्चर्य वाटते, असा शब्दांत न्यायालयाने तपासयंत्रणेच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. दरवेळेस न्यायालयासमोर काहीतरी तपास अहवाल सादर केले जातात. मात्र, त्यातून काही समोर येत नाही, अशी नाराजी उच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केली.