दापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस दुर्घटनेच्या नव्या व्हिडीओमुळे खळबळ

0
4218

रत्नागिरी, दि. ३० (पीसीबी) –  दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस  अंबेनळी घाटात कोसळली होती. या बस दुर्घटनेप्रकरणी आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बसचा चालक बस थांबवून घाटामध्ये उतरत असल्याचे दिसत आहे. शेजारुन जाणाऱ्या एका गाडीतून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. या व्हिडोओमुळे या प्रकऱणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

या व्हिडीओमुळे बस दरीत कोसळण्याआधी घाटामध्ये थांबली असल्याचे सिध्द होत आहे. या बसवर प्रशांत भांबेड आणि बाबू झगडे हे दोन चालक होते. त्यापैकी बाबू झगडे हा बसच्या शेजारच्या दरवाजातून खाली उतरताना दिसत आहे. मात्र, बाबू झगडे बसमधून उतरल्यानंतर नेमके काय झाले? हे मात्र अजूनही समजू शकलेले नाही .

दरम्यान, या अपघातातील मृतांचे नातेवाईक बुधवारी (दि.२९) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात गेले होते. प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांची नार्को टेस्ट करुन दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.