दापोली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाई जबाबदार; सीआयडी चौकशीची मागणी

0
2215

रत्नागिरी, दि. २९ (पीसीबी) – अंबेनळी बस अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच गाडी चालवत होते. तेच या अपघाताला कारणीभूत आहेत, असा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रकाश सावंत देसाई यांना दापोली कृषी विद्यापीठाच्या सेवेतून निलंबित  करून सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी,  अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

नातेवाईकांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून निलंबित करून  त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांची नार्को टेस्ट करुन दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी नातेवाईकांनी केली.

बस दरीत  ज्या ठिकाणी कोसळली, तेथील भाग हा कातळाचा आहे, तिथे मातीचा लवलेशही नाही, तिथून ट्रेकर्सही सहजरित्या वर चढू शकत नाहीत, मग प्रकाश सावंत देसाई कोणत्याही साधनाशिवाय वर कसे येऊ शकतात, पलटी होत असलेल्या बसमधून स्वतः तीन ते चार कोलांट्या खाल्ल्याचे प्रकाश सावंत देसाई सांगतात.  मग एवढ्या कोलांट्या खाऊन बाहेर फेकला गेलेला माणूस सहजरित्या वर कसा येऊ शकतो, त्याच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि तोच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर केला.

दरम्यान, पावसाळी सहलीला निघालेल्या दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस २८ जुलै रोजी अंबेनळी घाटातील दरीत कोसळली होती.  या अपघातात बसमधील ३१ पैकी ३० जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातातून प्रकाश सावंत देसाई आश्चर्यकारकरीत्या बचावले होते.