दापोडीत सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; बलात्काराचा संशय

0
955

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – दापोडीतील एका घरात सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्या चिमुकलीवर अज्ञाताने बलात्कार करुन तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी दापोडी येथील घरात घडली.

याप्रकरणी सध्या भोसरी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पॉक्सो) आणि हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत सात वर्षीय मुलगी ही दापोडी येथे तिची आई आणि बहिणीसोबत राहत होती. सकाळच्या सुमारास मुलीची आई कामावर तर मोठी बहिणी शाळेत गेली होती. यादरम्यान सात वर्षीय मुलगी घरी एकटीच होती. यावेळी अज्ञात नराधमाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा खून करुन पसार झाला. याप्रकरणी सध्या भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मुलीचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.