Bhosari

दापोडीत घोडागाडी घेऊन घरी निघालेल्या दोघांना जबर मारहाण

By PCB Author

October 26, 2018

दापोडी, दि. २६ (पीसीबी) – मिरवणूक उरकल्यानंतर घोडागाडी घेऊन घरी निघालेल्या दोघांना चार जणांनी अडवून जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २४) रात्री अकराच्या सुमारास दापोडी येथील बुद्धविहाराजवळ घडली.

याप्रकरणी एजाज निसार शेख (वय १८, रा. डेक्कन जिमखाना, पुलाची वाडी, पुणे) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख याचा घोडागाडीचा व्यवसाय आहे. बुधवारी तो आणि त्याचा कामगार मित्र अनिल ढगे दापोडी येथे मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी आले होते. मिरवणूक संपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास ते दोघे घोडागाडी घेऊन घराकडे निघाले होते. यावेळी ते दापोडी येथील बौद्धविहारजवळ आले असता चार अज्ञातांनी शेख याची घोडागाडी अडवून त्याला आणि त्याच्या मित्र अनिल याला जबर मारहाण केली आणि पसार झाले. यामध्ये शेख आणि अनिल दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.